मैं

मैं
मैं

Monday, July 11, 2011

मला भेटलेल्या साधनाताई .....


पराग अ. मगर

स्वतंत्र पत्रकार.

Paragmagar8@gmail.com

Mo. 8055289712,

तो दिवस आजही आठवतो आणि स्वतःच्या मूर्खपणाबद्दल हसूही येतं. आनंदवनात साधनाताईना भेटण्याची पहिली वहिली वेळ. मागल्या वर्षी दत्तपुरातील कुष्टरोग्यांवर डोक्युमेंटरी बनवण्याचा प्रोजेक्ट हाती घेतला. काम जवळ जवळ पूर्ण होतच आलं होतं पण तरीही त्यात काहीतरी कमतरता वाटत होती. कमतरता होती ती साधनाताईंच्या मुलाखतीची आणि त्याची पूर्वकल्पना देण्यासाठी आणि त्यांची अनुमती घेण्यासाठी म्हणून आम्ही आनंदवनासाठी निघालो. मनात साधनताईंना भेटायची खूप उत्सुकता होती आणि आमच्या डोक्युमेंटरी बाबत सांगायची सुद्धा.

खूप वर्षापूर्वी म्हणजे लहानपणी एकदा ट्यूशन च्या ट्रीप सोबत आनंदवनात आलो होतो. तेव्हा कुष्टरोगी म्हणजे काय त्यांचं दुःख काय असतं याविषयी काडीमात्र कल्पना नव्हती. तेव्हा आनंदवन म्हणजे फक्त एक गार्डन वाटत होतं.

आनंदवनात आता बराच बदल झाला होता. बाबा आमटेंच्या मृत्यूनंतर सगळी जबाबदारी साधंनताईंवर आली होती आणि ती पार पाडण्यात साधनाताई कुठेही कमी पडल्या नव्हत्या. त्यांना भेटण्याची वेळ ठरलेली होती. बराच वेळ असल्यामुळे पहिल्यांदा थेट तिथल्या कुष्टरोग्यांच्या रुग्णालयात गेलो. बराच वेळ त्यांच्याशी बोललो. एक दहा ते बारा वर्षाचा मुलगा तिथे होता ज्याचा पाय कापण्यात आला होता. त्याच्याशी खूप गप्पा मारल्या. पण खरतर मनात कुठेतरी काटा रुतावा अशी सल टोचत होती.

दुपारी तीन च्या सुमारास साधंनाताईंना भेटायची वेळ झाली. एका मोठ्या झाडाखाली हिरव्या कापडाचा मोठा शेड बांधला होता. एका बाजूला साध्या प्लॅस्टिकच्या खुर्चीवर साधंनाताई शांत बसल्या होत्या. अगदी एखाद्या ध्यानस्थ मूर्तीसारख्या. अंधारात नंदादीप लावल्यावर जसा तो उजळून निघावा तशा एखाद्या नंदादीपासारख्याच त्या भासत होत्या. अतिशय शांत मुद्रा, हलकं स्मितहास्य, पण तेवढच तेज चेहर्‍यावर दिसत होतं त्यांच्या.खरतर त्या शरीराने आता खूप थकल्या होत्या पण मनाने मात्र त्या अजूनही थकल्या नव्हत्या आणि म्हणूनच चेहर्‍यावर एक शांत पण तेवढाच गंभीर भाव झळकत होता.

आमच्यासारखेच बरेच जन त्यांना भेटायला रोज येत असतील पण कधीही या सगळ्यांचा तिटकारा मात्र त्यांनी कधीही केला नाही. गर्दी ओसरल्यावर आम्ही त्यांच्या शेजारी जाऊन बसलो. त्यांचा हात आपल्या हाती घ्यायचा खूप विचार झाला पण तो मोह आवरला कारण मनात भीती होती. रागवल्या तर. खरतर त्यांच्याशी बोलण्याची खूप भीती वाटत होती. वाटत होतं या ध्यानस्थ मूर्तीकडे असच बघत राहावं. पण लगेच भान आलं कि आपल्या कडे वेळही कमी आहे आणि त्याही जास्त वेळ बसू शकणार नाही.

कशाने सुरवात करावी हाही प्रश्नच होता. मग मनात एकदम विचार आला कि आपल्याला त्यांचं आत्मचरित्र समिधा घ्यायचं आहे कारण ते वाचण्याची इच्छा खूप दिवसापासून होती आणि म्हणून नकळत मी त्यांना एकदम प्रश्न विचारला कि तुमच्या पुस्तकाबद्दल काही सांगा ना? आणि शांत भासण्यार्‍या साधंनाताई एकदम माझ्यावर रागावल्या कि हा काय पागलासारखा प्रश्न विचारता? माझ्याच पुस्तकाबद्दल मी काय सांगणार आणि खरच तुम्ही ते पुस्तक मला प्रश्न विचारण्यापूर्वी वाचलं आहे का ? कारण खरच ते पुस्तक तुम्ही वाचलं असतं तर असा मूर्खासारखा प्रश्न मला विचारलाच नसता. हे सगळं ऐकून माझी व्यथा तर एकदम केविलवाणी होऊन गेली होती. मनात सतत मी स्वतःला शिव्या देत होतो कि हे काय विचारून बसलो. एकदम अपराधी झाल्यासारख वाटत होतं.

हे सगळं पाहून माझ्या मित्रांनाही काय विचारावं हे कळत नव्हतं. थोड्या वेळाने त्याच एकदम समजवण्याच्या स्वरात माझ्याशी बोलू लागल्या तेव्हा कुठे मला थोड हायसं वाटलं. मग आम्ही त्यांना आमच्या डोक्युमेंटरी बद्दल सांगितलं आणि नकळत त्या आपल्या जुन्या दिवसांमध्ये रमून गेल्या. मग कुष्टरोग्यांविषयी त्यांच्याशी बरीच चर्चा झाली. कुष्टरोग्यांची सेवा करताना त्यांना आणि बाबांना किती हाल अपेष्ठा सहन कराव्या लागल्या, माजानं किती नाकारलं हेही त्या सांगत होत्या पण आज त्या समाधानी होत्या कारण आज परिस्थिति पूर्ण वेगळी होती. त्यांच्या आणि बाबांच्या प्रयत्नांना यश आलं होतं. आज कुष्ठरोग पूर्णतः संपण्याच्या मार्गावर आहे. आम्ही तुमची मुलाखत घ्यायला कॅमेरा घेऊन नक्की येऊ एवढ सांगून आम्ही तिथून निघालो.

नंतर आम्ही तिथे राहणार्‍या कुष्टरोगी स्त्रियांची भेट घेतली ज्या नेहमीच आपल्या घरचं कुणीतरी आपल्याला भेटायला येईल या आशेवर रस्त्याकडे डोळा लाऊन बसलेल्या असतात. आपलं दुःख सांगताना आमच्या डोक्यावर हात फिरवून त्या म्हणायच्या कि तुम्ही कोण कुठले काही संबंध नसताना आम्हाला भेटता. आमची चौकशी करता. आमचे नातूही तुमच्या एवढेच असतील पण ते मात्र कधीही इकडे चुकूनही येत नाही. एक तुटलेली नाळ जोडण्याचा त्यांचा हा वेडा प्रयत्न.....

आज साधनाताईंच्या मृत्युची बातमी ऐकताच त्यांची भेट, त्या रागवल्या तो प्रसंग डोळ्यासमोर आजही तसाच उभा आहे आणि अपराधी या साठीही वाटत आहे कि त्यांची मुलाखत आमच्या डोक्युमेंटरी साठी घ्यायची राहून गेली ......

त्यांच्या मुलाखतीशिवाय ती डोक्युमेंटरी नेहमीच अपूर्णच राहील.........

पराग अ. मगर

1 comment:

  1. that time u like a good reporter
    "Nehmi badbad karaycha aaj matra tyala disha milali ase vatat ahe Gr8 writting parag bhau"

    ReplyDelete