मैं

मैं
मैं

Sunday, October 28, 2012

लढा लैंगिक गुलामगिरीविरुद्धचा : मूर्ती लहान कर्तृत्व महान ..

Bookmark and SharePrintE-mail
आरती कदम 
arati.kadam@expressindia.com
alt
वयाच्या पंधराव्या वर्षी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला, पण त्याने उद्ध्वस्त न होता त्यातल्या विखारालाच हत्यार बनवत हैदराबादच्या डॉ. सुनीता कृष्णन यांनी संघटना स्थापन केली ‘प्रज्वला’. वेश्याव्यवसायातल्या ३२०० मुलींना बाहेर काढणाऱ्या आणि वेश्यांच्या ५००० मुलांसाठी शाळा उघडणाऱ्या डॉ. सुनीता यांचा लढा सुरू आहे तो लैंगिक गुलामगिरीविरुद्धचा. दररोज मृत्यूला सामोरं जाणाऱ्या सुनीताच्या या लढय़ाची ही दास्तान..

वयाच्या पंधराव्या वर्षी सुनीताला आयुष्यातल्या सर्वात मोठय़ा आघाताला सामोरं जावं लागलं. तो आघात होता सामूहिक बलात्काराचा. आता तिच्यासमोर दोनच पर्याय होते. रडत, ओरडत जगाला दोष देत नशिबी आलेलं बहिष्कृत जगणं जगायचं किंवा त्यातून जन्माला आलेल्या विखाराला हत्यार बनवत समाजातल्या असंख्य मुली, स्त्रियांच्या वाटय़ाला आलेल्या अशा जगण्यातून बाहेर काढायचं. तिने दुसरा पर्याय स्वीकारला.. तेव्हा तिला माहीतही नव्हतं हा मार्ग इतका खडतर आहे की, तिला रोजच्या रोज स्वत:च्या आयुष्याची बाजी लावावी लागणार आहे. मृत्यू कायम दोन हातांवर उभा असणार आहे. पण तरीही गेली १७ वष्रे ती फक्त लढतेच आहे, कारण ही लढाई आता युद्धात बदलली आहे. ती आता माघार घेणार नाहीए कारण तिला द्यायचंय रोजच्या रोज नरकयातना सहन करणाऱ्या वेश्याव्यवसायातील लाखो मुली, स्त्रियांना सन्मानाचं आयुष्य. त्यासाठी तिचा संघर्ष सुरू आहे.. तो संघर्ष आहे, सामान्य माणसातील दांभिक प्रवृत्तीविरुद्धचा, तो संघर्ष आहे तीन वर्षांच्या मुलींपासून पन्नाशीच्या बाईपर्यंत कोणत्याही स्त्रीला आपल्या शारीरिक भुकेसाठी लक्ष्य करणाऱ्या स्वार्थी प्रवृत्तीविरुद्धचा. तो संघर्ष आहे पशाच्या आणि सत्तेच्या बळावर माणसाला गुलाम म्हणून वापरण्याच्या प्रवृत्तीविरुद्धचा. कारण इथे माणूस माणूसपण विसरत चालला आहे आणि हेच तिच्या समोरचं सर्वात मोठं आव्हान आहे.
  तिचा हा संघर्ष सोपा नाहीच कारण आता वेश्याव्यवसाय फक्त गल्लीबोळातला राहिलेला नाही तोही आता आंतरराष्ट्रीय झालाय. जगातली ही तिसऱ्या क्रमांकाची संघटित गुन्हेगारी मानली जाते आणि ती आहे दहा अब्ज डॉलर्सची इंडस्ट्री!
माझी सुनीता कृष्णनशी ओळख झाली ती इंटरनेटच्या माध्यमातूनच. ‘टेड’ कॉन्फरन्समधल्या तिच्या दहा मिनिटांच्या भाषणाची क्लिप मी पाहिली आणि हादरून गेले. वेश्याव्यवसायातल्या भयानकतेची कल्पना आपल्याला असतेच पण जेव्हा तिच्या तोंडून तिचे अनुभव ऐकतो तेव्हा या भीषण सत्याला स्वीकारणं अवघड होऊन जातं. माणूस आपलं माणूसपण इतकं कसं हरवू शकतो?  हा प्रश्न छळायला लागतो. तिने सांगितली एका शाहिनची गोष्ट. कुणीतरी माहिती दिली, एक तीन वर्षांची मुलगी रेल्वे ट्रॅकवर मिळालीय. आपल्या सहकाऱ्यांसह सुनीता तिथे पोहोचली तेव्हा त्या मुलीवर इतके बलात्कार झालेले होते की तिची आतडी बाहेर आलेली होती. तातडीचं ऑपरेशन करून ३२ टाके घालून ती पूर्ववत करावी लागली, पण त्या मुलीच्या नशिबात जगणं नव्हतंच. एड्सने तिचा घास घेतलाच. शाहिदा अशीच एक मुलगी. नऊ वर्षांची असताना तिच्या मामानेच तिला विकलं. अनेक पुरुषांच्या वासनेला बळी पडलेल्या शाहिदाला सुनीताने सोडवून आणलं, पण नंतर आईकडे परत गेलेल्या शाहिदालाही तसाच दर्दनाक मृत्यू आला तो एड्समुळे. तिच्या अंत्यसंस्कारांसाठी पसेही नसणाऱ्या तिच्या आईने तिला मशिदीसमोर टाकून दिली.. याच वयाच्या अंजलीला तिच्या दारूडय़ा बापानेच पोर्नोग्राफीसाठी विकलं. तिही आता एड्सनेच मरण पावलीय .. 
 या आणि अशा असंख्य कथा. प्रत्येक मुलीची, प्रत्येक स्त्रीची वेगळी, पण त्यांचा शेवट एकच, जिल्लतभरी मौत!  म्हणूनच सुनीताने ठरवलं, या मुलींना यातून बाहेर काढायचं. आत्तापर्यंत सुनीताने ३२०० मुलींसह सुमारे ५००० स्त्रियांना या वेश्यव्यवसायाच्या दलदलीतून बाहेर काढलंय. इतकंच नव्हे तर पिढी दर पिढी चालणारा वेश्याव्यवसाय थांबावा म्हणून वेश्यांच्या मुलांसाठी तिने शाळा सुरू केल्यात. हैदराबादमध्ये १७ ठिकाणी सुरू असलेल्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये ही मुलं शिकताहेत. सोडवून आलेल्या मुली विविध व्यवसायांचं प्रशिक्षण घेताहेत. सुतारकाम, गवंडीकाम, बुकबाइंडिंग, वेल्डिंगसारख्या कामापासून आता या मुली टीव्ही चॅनलवरच्या कॅमेरावूमन म्हणून, हॉस्पिटल्स, सॉफ्टवेअर इंडस्ट्रीजमध्ये स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. आतापर्यंत ७८० मुलींची तिने लग्नंही लावली आहेत आणि ४७ नातवंडांची ती आजीही झालेली आहे. मुलींना सन्मानाचं आयुष्य देण्याचं तिचं स्वप्न काही प्रमाणात सत्यात उतरलं आहे, पण आजही ते अधुरं आहे. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी तिला गरज आहे ती आíथक मदतीची आणि प्रामाणिकपणे, तळमळीने काम करणाऱ्या मनुष्यबळाची!
 गेली १७ वष्रे सुरू असलेला हा अथक प्रवास सोपा नव्हताच. आजही नाही. सुनीताचा डॉक्टर सुनीता होण्यापर्यंतचा प्रवासही असामान्यच आहे.. ती सुनीता कृष्णन. एका लहानशा गावात आईवडिलांबरोबर राहणारी. एक साधी सुधी, लहानखुरी, काळीसावळी मुलगी. शाळेतही जिला ‘बुटका बंगन’ म्हणूनच मुलं चिडवायची. मात्र सामाजिक प्रश्नांचं भान तसं तिला लहानपणापासूनच होतं. शेजारपाजारच्या गरीब मुलांना शिकवणं हा तिचा अगदी शाळेत असल्यापासूनचा छंद. अडल्या नडल्यांना मदतीसाठी ती कायम पुढे असायची. इतकी की तुमच्या मुलीसारखी मुलगी सगळ्यांना मिळो असं तिच्या आईवडिलांना सांगितलं जायचं. पण एक दिवस असा आला की हीच सगळ्यांची लाडली मुलगी अनेकांच्या नजरेचा विखार झाली. सहानुभूती तर जाऊच द्या पण यात तुझाच काही तरी दोष असणार, असं ऐकवलं जाऊ लागलं. तिच्या नशिबी आलं बहिष्कृत जगणं.. पंधरा वर्षांच्या सुनीतावर आठ जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. ती कोलमडून पडली. यात माझा काय दोष, ती स्वत:ला समजवायची. पण कुणीही आधार देणारं, समजून घेणारं नव्हतं. सोबतीला होता तो फक्त भयाण एकटेपणा.. तब्बल दोन वर्षांचा!  हा एकटेपणाच तिचा गुरू झाला. माझ्यावरच्या एका प्रसंगाने मला जर असं आयुष्य जगावं लागत असेल तर ज्यांना रोजच्या रोज लंगिक अत्याचारांना सामोरं जावं लागतंय, ज्या वेश्याव्यवसायात खितपत पडल्या आहेत त्याचं काय, या एकच प्रश्नाने तिच्यातल्या दुर्बलतेवर मात केली. तिला आता ठामपणे उभं राहायचं होतं अशा असंख्य मुलींसाठी ज्यांच्यावर असं भीषण आयुष्य आणि पर्यायाने तितकाच भीषण मृत्यू लादला गेलाय.
 सुनीताच्या लक्षात आलं, त्यांच्यासाठी काही करायचं असेल तर स्वत:ला आíथकदृष्टय़ा आणि बौद्धिकदृष्टय़ाही सबळ करायला हवं. तिने दारोदार साबण, अगरबत्ती विकायला सुरुवात केली. कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. बी.एस्सी. (एन्व्हॉयर्न्मेंटल सायन्स), एमएसडब्लू (सायकियाट्रिक सोशल वर्क) इतकंच नव्हे तर पीएच.डी. (सोशल वर्क) ही केली. ती आता डॉक्टर सुनीता झाली.. दरम्यान कामाची दिशा ती शोधत होतीच. कुणासाठी काम करायचं हे पक्कं होतं, पण काय आणि कसं करायचं हा प्रश्न होताच. ती रोजच्या रोज तिथल्या रेड लाइट एरियात जायला लागली. मी तुमच्यासाठी काय करू शकते, असं तिथल्याच बायकांना विचारू लागली. पण माणुसकीवरचा विश्वासच उडालेल्या तिथल्या बायकांना तिच्या अस्तित्वाची दखल घ्यावीशी वाटली नाही. त्या तिला तिथून हाकलून लावायच्या, ओरडायच्या. एक बाई तर तिच्या तोंडावर थुंकलीच. पण एक अनामिक शक्ती सुनीताला बळ देत राहिली. तिच्यातलं हे सातत्य बघून त्याच बाईने तिला जवळ बोलावलं. म्हणाली, ‘तुला आमच्यासाठी काही करायचंय ना. या मुलीसाठी काही कर.’ सुनीता सांगते, ‘‘तिने एका दहा वर्षांच्या मुलीकडे बोट दाखवलं. मतिमंद वाटावी अशी ती मुलगी. एका कोपऱ्यात बसली होती. मी पाहात होते. दर पंधरा-वीस मिनिटांनी एक पुरुष यायचा तिला आत घेऊन जायचा. तिच्यावर बलात्कार करायचा आणि बाहेर आणून बसवायचा. जाताना दहा रुपये तिच्या ब्लाऊजमध्ये खुपसायचा. ती मुलगी काही समजण्यापलीकडे गेली होती. तीन-चार दिवसांत मी त्या मुलीचा पत्ता शोधून काढला. मी तिला घेऊन निघाले. त्या बाईलाच सांगितलं. मी हिला घेऊन चाललेय. कुणी येतंय माझ्या बरोबर.? तिघीजणी निघाल्या. आम्ही तिचं घर शोधून काढलं. थेट गाव पंचायतीतच उभं केलं. माझ्या बरोबरच्या त्या बायांनी स्पष्टपणे ती ‘पाक’ असल्याचं सांगितलं. मी चकित झाले. ज्या पद्धतीने त्या बाया त्या मुलीसाठी भांडत होत्या, मला त्यांच्यात माणुसकी अजून जिवंत असल्याचं जाणवलं. मुलीचे आईवडील वारले होते. आणि काकाने इस्टेटीसाठी तिला हाकलून दिलं होतं. त्या मुलीला तिच्या घरी पोहोचवून आम्ही परतलो आणि आतापर्यंत ज्या वेश्यागृहाने मला अव्हेरलं होतं त्यांनी माझं मोठय़ा मनाने स्वागत केलं. मी एका दिवसात सुनीताची सुनीता मॅडम झाले आणि त्यांचे प्रश्न माझे झाले..’’
 आता प्रश्न रेशनकार्ड मिळवण्याचा असो की एकमेकींमधील भांडणाचा सुनीताच्या मध्यस्तीने प्रश्न सुटू लागले. पण खरा लढा वेगळा होता. मुलींना यातून बाहेर काढायला हवं हे तिने या बायांच्याच गळी उतरवलं. आणि सुरू झाली लढाई, रोजच्या रोज नवा संघर्ष. त्यासाठी तिच्या इन्फॉर्मर बनल्या याच बाया. कुठलीही नवी मुलगी आली की त्या हिला तिची माहिती द्यायच्या आणि सुनीता लपत छपत जाऊन त्या मुलीला सोडवून आणायची. जवळच्याच एका रिकाम्या झालेल्या वेश्यालयाचा तिने आधार घेतला आणि सुटका सुरू झाली. हळूहळू तिने आपल्या सहकाऱ्यांसह संघटना बांधायला सुरू केली. त्यातूनच हैदराबादमध्ये स्थापन झाली ‘प्रज्वला’ अर्थात अंतज्र्योत ही सेवाभावी संस्था. पण ही वाट बिकट होती. मुलींची सुटका अनेकांचं नुकसान करणारं होतं. कारण यात अनेकांचे पसे अडकलेले असतात. साहजिकच व्यापारी आणि दलालांचा हल्ला सुनीता व तिच्या सहकाऱ्यांवर व्हायचाच. आत्तापर्यंत सुनीतावर १६ जीवघेणे हल्ले झालेले आहेत. ‘प्रज्वला’चं ऑफिस तर आतापर्यंत कितीतरी वेळा या हल्लेखोरांच्या भक्ष्यस्थानी पडलंय. मुलींची सुरक्षा आणि त्यांचे व्यापारी व दलालांचा हल्ला ही दुहेरी जबाबदारी सांभाळणं कठीण होतं. सुरुवातीला पोलिसांवरही विश्वास नसलेली सुनीता त्यांची मदत घ्यायला टाळत असे, पण जेव्हा तिच्या डोळ्यांसमोर तिच्या सहकाऱ्याची हत्या झाली तेव्हापासून मात्र तिने पोलिसांची मदत घ्यायला सुरुवात केली. ..
आता तिचं रेस्क्यू ऑपरेशन जोरात सुरू झालं. पण नव्या मुलींना सोडवणं आणि जुन्यांना सोडवणं यात फरक असतोच. सुनीताच्या शब्दात तो ‘फोर्सिबल इव्हेंट’ ठरतो. कारण तोपर्यंत या मुली त्या जगण्याला सरावलेल्या असतात. सुरुवातीला या मुलींनी भयानक अनुभव घेतलेले असतात. तिने ‘कामा’ला सुरुवात करावी म्हणून तिच्यावर वाट्टेल ते अत्याचार केले जातात. अगदी कातडी जळून जाईल असे चटके देण्यापासून गुप्तांगात मिरचीची पूड घालण्यापर्यंत काहीही. शिव्या आणि मारहाण तर नेहमीचीच. चंद्रपूर जिल्ह्य़ातल्या सुटका केलेल्या १४ वर्षांच्या एका मुलीने सुनीताला तिची दर्दभरी कहाणी ऐकवली, तिने सांगितलं, ‘‘मी जेव्हा जेव्हा आलेल्या गिऱ्हाइकाला नकार द्यायची, तेव्हा तेव्हा माझी शेठाणी तिच्या कुत्र्याला माझ्या सहा महिन्यांच्या मुलावर सोडायची. ते कुत्रं माझ्या बाळाला चावायचं आणि मी रडत ओरडत शेवटी शरण जायची.’’ सुनीता सांगते, ‘‘आम्ही जेव्हा ते बाळ पाहिलं तेव्हा त्याचं सर्वाग चाव्याने भरलेलं होतं. खरं तर ते इतके दिवस जिवंत कसं राहिलं हेच आश्चर्याचं होतं. अर्थात आठवडय़ाभरातच ते मेलं. पण असे भयानक अनुभव या मुलींना घ्यावेच लागतात. अनेकींना तर दिवसाला शंभर गिऱ्हाइकं सहन करावी लागतात. त्यामुळे त्यांच्याही लक्षात आलंय, जेवढा जास्त प्रतिकार तेवढा जास्त छळ. मग हळूहळू या मुली ते जगणं स्वीकारतात. त्यांची शेठाणी त्यांची आंटी होते आणि दलाल बॉयफ्रेंड. साहजिकच आम्ही जेव्हा त्यांना सोडवायला जातो तेव्हा आम्ही नक्की सुटका करतोय का, याची खात्री नसल्याने आमच्याबरोबर यायला त्या नाखूश असतात, मग त्यांना आणणं हा जबरदस्तीचा मामला होतो. पण आता या गोष्टीही सरावाच्या झाल्यात. आम्ही मुली सोडवून आणतो, मग आमच्यावर शारीरिक हल्ले होतात, ऑफिस फुटतं. सगळ्या गोष्टी अगदी त्याच क्रमाने आणि तितक्याच अपरिहार्य.. पण खरी कसोटी पुढेच असते. या सोडवून आणलेल्या मुलींना भावनिक आधार देण्याची. जवळजवळ एक दीड महिना लागतो त्यांना सामान्य होण्यात. अनेकींना तर आपलं नावही माहीत नसतं. घरचा पत्ता तर दूरच. पण हळूहळू त्यांच्याही लक्षात येतं आपली खरंच सुटका झालीय. मग त्या सहकार्य करायला तयार होतात. आमच्या इन्फॉर्मरही बनतात. आमच्या सहकारीही. प्रशिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभं राहातात. इतरांना त्यासाठी मदत करतात.’’
 मुलींना या दलदलीतून बाहेर काढण्याचा सुनीताचा हा प्रवास मात्र अधिकाधिक कठीण होत जातोय तो पैशांच्या अभावी. सोडवून आणलेल्या मुली आणि वेश्यांच्या मुलांच्या रोजच्या जगण्यासाठी, अन्नासाठी, शिक्षणासाठी आणि हो, महत्त्वाचं म्हणजे अंत्यसंस्कारांसाठीही तिला पसा हवा आहे. कारण इथे येणारे एक तृतीयांश लोक अगदी वेश्यांच्या मुलांसह एचआयव्ही किंवा एड्सग्रस्त आहेत. त्यांना मानाने जगणं देण्याबरोबरच आदराने मरणही तिला द्यायचंय..
मुलांच्या शाळेसाठी इमारत बांधण्याचं काम सुरू करायचं होतं तेव्हा पसा गोळा करण्यासाठी सुनीता अक्षरश: दारोदार िहडली. तेव्हाही तिला माणुसकी हरवल्याचाच अनुभव आला. एका अधिकाऱ्याने तिच्याकडून तासभर ही माहिती ऐकून घेतली आणि वॉलेट काढून ५००, १०० च्या नोटांतून ५० रुपयांची नोट काढून हातावर टेकवली. दुसऱ्या एकाने मी तुला दहा हजार देतो पण ४० हजारांच्या व्हाऊचरवर सही कर म्हणून सांगितलं. उद्विग्न सुनीता तिथून बाहेर पडली खरी, पण तिच्या मुलांचा उद्या तिला अस्वस्थ करत होता. आणि आता तिला हजारो रुपयांची मदत मिळून चालणार नव्हतं, आता लाखो रुपये हवे होते. मी वर उल्लेख केलेल्या ‘टेड’ कॉन्फरन्समधल्या भाषणाने प्रभावित होऊन तिथल्या तिथे दहा जणांनी एक एक हजार डॉलर्सची मदत केली. इतकंच नव्हे तर ‘गुगल’ने तिला एक लाख डॉलर्सची देणगी दिलीय. त्यामुळे तिचा इमारत बांधणीचा प्रश्न मोठय़ा प्रमाणात सुटलाय, पण आजही ती आíथक प्रश्नांशी झुंजते आहे. पण या प्रश्नापेक्षाही सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाशी ती झुंजते आहे तो म्हणजे लोकांच्या मानसिकतेचा!
 वेश्यांकडे बघण्याची वृत्ती आजही नकारात्मक आहे. या मुली, स्त्रियांना समाजात स्वीकार हवाय, त्यांना समजून घेणारं कुणी हवंय ते झालं तरच खऱ्या अर्थाने त्यांचं पुनर्वसन होईल आणि सबलीकरणही. पण हे विचार रुजायला हवेत. सुनीताने याही बाबतीत अतिशय दारुण अनुभव पचवलेत. ती सांगते, ‘‘माझ्या कामाचा प्रचंड आदर असलेली माझी एक मत्रीण. भाज्यांसाठी दरमहा दोन हजार रुपये देणारी. तिच्या आईच्या देखभालीसाठी एका मुलीची गरज होती. ती मला म्हणाली, ‘आईसाठी एखादी मुलगी मिळते का बघ फक्त ती आपल्या या मुलींमधली नको.’’ माणसातल्या दांभिकतेचा हा कळस असतो. म्हणूनच ती आता आवाहन करतेय समाजाला, ‘त्यांना आपलं म्हणा. त्यांनाही सन्मानाने जगायचंय. या व्यवसायात येण्याआधी त्याही सामान्यच होत्या, मग काही काळ त्यांच्यावरच्या झालेल्या अत्याचाराने, तेही माणसांनीच केलेल्या, त्या तिरस्करणीय कशा होतात?’
डॉ. सुनीताची ही लढाई म्हणून फक्त तिची नाही, ती समाजाची आहे, समाजातल्या वाईट प्रवृत्तीविरुद्धची आहे. त्यासाठी तिने असंख्य वार झेललेत. आतापर्यंत तिच्यावर १६ जीवघेणे हल्लेही झालेत. नुकत्याच एका अ‍ॅसिड हल्ल्यातून ती वाचलीय, मारामुळे तिचा डावा कान निकामी झाला आहे. ती म्हणते, ‘‘आतापर्यंत त्यांच्याकडे काठय़ा, चाकू होते, पण आता त्यांच्याकडे बंदुका आल्या आहेत. मी कोणत्याही क्षणी त्यांची लक्ष्य बनू शकते. पण आजपर्यंत मी जिवंत आहे, याचा अर्थ माझं काम पूर्ण झालेलं नाही. जोपर्यंत माझं इथलं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत मला मृत्यू येणार नाही, याची मला खात्री आहे.’’
संकेतस्थळ - www.prajwalaindia.com
संपर्क - +९१४०-२४५१०२९०
ईमेल - praj_2010@yahoo.com
sabhaar
आरती कदम .......

No comments:

Post a Comment